Thursday, July 6, 2017
भारतातील नद्या आणि त्यांची संपूर्ण माहिती
🔹सीना नदी
भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.
मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.
----------------------------------------------
🔹कुंदा नदी :
निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या
कुंदा नदीप्रकल्प
खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.
कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे.
------------------------------------------
🔹महीनदी :
(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते.
पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे.
मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते.
------------------------------------------
🔹भवानी नदी :
द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात.
जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे.
-----------------------------------------
🔹काटेपूर्णा नदी :
अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरुळ, अकोला आणि मुर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते. अकोल्यापासून आग्नेयीकडे ३५ किमी. वरील वास्तापूर या गावानजीक या नदीवर मातीचे धरण बांधून अंदाजे २४,००० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलत करण्याची योजना आहे.
--------------------------------------
🔹मांजरा नदी :
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.
मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.
------------------------------------
🔹वारणा नदी :
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. ती कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.
काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो. सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागावजवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.
सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.
वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो. भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल आहे. वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.
वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.
----------------------------------------------
🔹माण नदी :
महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.
-------------------------------------------------
🔹सुरमा नदी :
भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८' उत्तर अक्षांश व ९४० १८' पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो.
सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते; मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते.
सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत.
---------------------------------------
🔹शिवालिक नदी :
उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे.
-------–------------------------------------------
Join us @MPSCGeography
🔹दामोदर नदी :
बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते.
सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते.
दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्वस्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत.
दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात.
दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे.
दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. सिंगभूम, पुरूलिया व रांची यांच्या सीमेवर डास्मा डोंगररांग असून यातून सुवर्णरेखा नदी मार्ग काढते. याच्या दक्षिणेस सिंगभूमच्या सपाट प्रदेशात अनेक अवशिष्ट शैल व माथ्यावर जांभा दगडांचा थर असलेली छोटी पठारे आहेत. चक्रधरपूर व चैबासा यांच्या पश्चिमेस छोटानागपूर पठाराची कड आहे. या पठारावर अनेक उपपठारे असून त्यांपैकी रांची पठार सु. ६१० मी. उंच आहे. ते पश्चिमेस ३१४ मी. पर्यंत उंच होत गेले
Subscribe to:
Post Comments (Atom)
♦️ चालू घडामोडी - ३१ ऑक्टोबर २०१७
#UPSC_MPSC_2018 ▪️ [WBCSD- वर्ल्ड बिजनेस कौन्सिल फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट सिंगापूरस्थित ओलम इंटरनॅशनलचे सहसंस्थपाक सनी वर्गीस यांना म...

-
पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी??? *ट्रीक-* राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रा...
-
99 वी घटनादुरूस्ती : ही सर्वात अलिकडील संमत झालेल्या घटनादुरूस्तींपैकी महत्वाची घटनादुरुस्ती आहे. (100 वी घटनादुरुस्ती ही भारत आणि बांगल...
-
१) सुभाषचंद्र बोस -- नेताजी २) रविंद्रनाथ टागोर -- गुरुदेव ३) पंडित जवाहरलाल नेहरू -- चाचा ४) मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता ५)...
No comments:
Post a Comment